रंजकी जब...

केदार पाटणकर - ⏱ १ मिनिट

मित्रांनो नमस्कार, 
उर्दूमधील
रंजकी जब गुफ्तगू होने लगी
'आप'से 'तुम' 'तुम'से 'तू' होने लगी ...
ही सुपरिचित गझल आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल.  

    ओळख झाल्यावर समवयीन व्यक्तीसुध्दा एकदम एकेरीवर येत नाहीत. हळुहळू परिचय वाढल्यावर आपोआप 'आपण' 'तुम्ही' वरून कधी  अरे तुरे सुरु होतं, कळतही नाही. मैत्रीचं नातं निर्माण होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं जातं. या शेरात तर दु:ख व्यक्त करण्याचा मामला आहे.  एकमेकांच्या व्यथा ऐकण्याचे  ते क्षण गहिरे होत जाऊन आदरार्थी बहुवचन कसं प्रेमळ एकवचनात रूपांतरीत होतं...याचं हा शेर अचूक शब्दांत वर्णन करतो.  
    
एकांत आहे, संध्याकाळ रात्रीकडे कलत चाललेली आहे, एक तरूण आणि एक तरूणी एकमेकांच्या सहवासात काही कारणामुळे आलेले आहेत, त्यांच्यात परिचयाची देवाणघेवाण होत आहे, पर्यायाने काही सुखं-दु:खं वाटली जात आहेत...असं दृष्य माझ्या डोळ्यांसमोर येतं. 
    अर्थात, ही घटना दोन तरूणांबाबतही घडू शकते, दोन तरूणींबाबतही.
    शिवाय, त्या दोन व्यक्ती नवजवानच असल्या पाहिजेत, असंही नाही. 
    शायराने व्यापक क्षितिज कवेत घेतले आहे. 

    मूळ मुद्दा आशयाचा आहे.     
    असाच, अगदी असाच शेर मराठीत लिहिला गेला आहे का, ही माझी जिज्ञासा आहे.
    अभ्यासूंनी ती पूर्ण करावी, ही विनंती.   

                                                                                                                           -केदार पाटणकर