'..तयार झालो!' एका अनामिक कवीची गझल.

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

दोस्तहो,


काही वर्षांपुर्वी एका मासिकात मी  ही  गझल वाचली होती. कवीने स्वतःचे नाव न लिहिता 'प्रवासी' या  टोपणनावाने ही  गझल  प्रकाशित केली  होती. हे  श्री. प्रवासी  कोण, हे कुणाला माहीत असेल तर जरूर कळवा.
गझल मात्र खूप सुरेख आहे.
तुम्हालाही  आवडेल  अशी  आशा  आहे.


"....तयार झालो."
-----------------------------
जसा  जसा  मी  जगावयाला  तयार झालो,
तसा  तसा  मी  लढावयाला  तयार  झालो..


सडा  असा  शिंपलास  तू  अंगणात  माझ्या,
पसा  पसा  मी  भरावयाला  तयार  झालो..


बघून  मागे  कशीबशी  हासलीस  जेव्हा,
कसाबसा  मी  हसावयाला  तयार  झालो..


न  खंत  आभाळ  फाटण्याची  मला  तशी  पण,
ससा  कसा  मी  बनावयाला  तयार  झालो?


विषा, तुला  ओळखून  होतो  तरी  कसा  रे,
नसा  नसा  मी  भरावयाला  तयार  झालो?


अखेर  तू  ही  मनातले  बोललीस  जेव्हा,
ढसा ढसा  मी  रडावयाला  तयार  झालो !


तुझी  न ही  पायधूळ  जेव्हा  मला  कळाले,
ठसा  ठसा  मी  पुसावयाला  तयार  झालो..


तिने  नव्याने  दिला  जरी  तो जुना  बहाणा,
असा  कसा  मी  फसावयाला  तयार  झालो?


 


 


-प्रवासी.
--------------------------------