
मनात माझ्या काहिच नव्हते पण तेंव्हाही
उगाच होते केले मी भांडण तेंव्हाही!
तुझा शोध घेण्यासाठी मी फिरून थकलो
निवांत मिटले डोळे... वणवण तेंव्हाही...
मिठीत येता सर्व गुन्ह्यांना माफी असते
मिळे कसे तुज रुसण्याचे कारण तेंव्हाही!
उगाच वाटे काळ थांबला कालच्यापरी
उडून गेले होते सारे क्षण तेंव्हाही...
तुझ्या नि माझ्या मधली सारी प्रकाशवर्षे
भरून होते ग्रह ताऱ्यांचे सण तेंव्हाही...
लिलाव सारे थांबवले मी स्वप्नांचे पण...
कुठे थांबली भावांची घसरण तेंव्हाही?
सुरू असावी फक्त सखे श्वासांची भाषा...
मधून बोले कसे तुझे काकण तेंव्हाही!!
तुला पाहुनी खुलुआ दिलाने छान म्हणावे
कशी कळेना तुला जमे तणतण तेंव्हाही!
तुला सांगुनी गेलो सारी भगवत गीता
मनात माझ्या जरी माजले रण तेंव्हाही....
-- प्रसाद शिरगांवकर
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा