एका उन्हाची कैफियत ही चंद्रशेखर सानेकरांच्या गझलांची सीडी जरूर ऐकावी अशी आहे. ही सीडी खरे तर २००१ या वर्षीची आहे.
या संग्रहात एकूण सात गझला आहेत. सानेकरांच्या शैलीशी ज्यांचा चांगलाच परिचय आहे त्यांची अपेक्षापूर्ती या गझलांनी निश्चितपणे होते. प्रामुख्याने पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी या गझला गायल्या आहेत. एक गझल त्यांनी व अमेय दाते यांनी गायली आहे. या गझला पुरुषमुखी आहेत. शेरांमध्ये पुरुषाचे कविमन आहे पण तसे असूनही फेणाणी -जोगळेकर यांच्या तोंडी त्या वावग्या वाटत नाहीत. त्यांनी उत्तम रीतीने परकायाप्रवेश केला आहे.
मयूर पै यांचे संगीत गझलांना योग्य असे आहे. केवळ गझलेत खास दिसणारा तो प्रणय, विरह, गझलेतील हुरहूर व गझलेतील आत्मसंवादाला या चाली पूरक आहेत.
एक वेडी आजमावू पाहते आहे मला
अन् तरीही ऐनवेळी टाळते आहे मला
ही गझल वेगवान आहे. (पिनाझ मसानी यांनी काही उर्दू गझला वेगवान गायल्या आहेत.)
एका गझलेतील कोरस अनावश्यक वाटतो. गझल हा जर दोन जिवांमधला संवाद असेल तर तो कोरस अगदीच अप्रस्तुत आहे.
किशोरकुमारच्या योडलिंगची आठवण जोगळेकर या गझलेत करून देतात. सौमित्र यांचे निवेदन आहे. सौमित्र स्वतः कवी असल्यामुळे त्यांच्याकडून निवेदनाचा विचार झालेला दिसतो. त्यांच्या शब्दफेकीतून हे जाणवते. फाऊंटन म्युझिकने ही सीडी बाजारात आणली आहे.
-केदार पाटणकर
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा