आहे उसंत कोठे

अनिरुद्ध अभ्यंकर - ⏱ १ मिनिट



आहे उसंत कोठे आता बसायला
आयुष्य लागले हे मजला पिसायला


मजला पराभवाची सुचताच कारणे
येते मलाच माझे थोडे हसायला


मी ही अजून थोडे बोलायला हवे
तू ही नकोस आता इतके रुसायला


वस्तीत आठवांच्या गर्दी अमाप ही
मज वाट सापडेना तेथे घुसायला


आला वसंत पुन्हा आली नवी फुले
इतके पुरे मनाला पुन्हा फसायला


आली कुठून स्वप्ने माझ्या मनात ही
घडले असे न काही स्वप्ने दिसायला


बाहूत वेदनेच्या होतो मजेत मी
आली सुखे तिथे ही मजला डसायला


मी वाट पाहिलेली होती चितेवरी
तेव्हा तरी हवी तू होती असायला


मी ही सुखात आहे आता तुझ्या विना
सुचले तुला परी ना डोळे पुसायला



गझल