उगाच काही क्षण हे करती अस्वस्थ
रित्या मनाला येते भरती अस्वस्थ
हले पिसारा सखये तुझिया केसांचा
उठे शहारा शरिरावरती अस्वस्थ
अजून जागर भवती घुमतो स्वप्नांचा
कितीक रात्री माझ्या सरती अस्वस्थ
इथे फुलांना ओझे छळते बहरांचे
खुळ्या दवाचे सलही ठरती अस्वस्थ
पहाटवेळी सलतो वारा अंगाशी -
झरे सुखांचे हृदयी झरती अस्वस्थ
कुठे दिसेना ढगही गगनी एखादा -
जळे उन्हाने व्याकुळ धरती अस्वस्थ
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर
गझल वाचण्यापूर्वी / नंतर - या गझलेतील रदीफ (अस्वस्थ) हा अटळ होता. त्याच्याबाबतीत काही जाणकारांना असे वाटू शकेल की, 'अस्वस्थ'च्या मात्रा तर पाच होतात! खरेही आहे; पण गद्यात किंवा इतर पद्यात जिथे हा शब्द कुठेतरी ओळीत येत असेल तिथे. मात्र याबाबतीत माझे म्हणणे असे की, 'अस्वस्थ' हा शब्द जेव्हा रदीफ म्हणून / शेवटी येतो, तेव्हा, '-स्थ'चा उच्चार हटकून दीर्घ होतो. त्यामुळे दीर्घोच्चारी शब्दाच्या मात्रा त्याला द्यायला हव्यात. निर्णय तुमच्या हाती !!!
कृपया, (असेल तर) आक्षेप अवश्य कळवावा !
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा