बांधुन मी घेतल्या न भवती कधी फुकाच्या भिंती
आकाशाच्या पलीकडे निर्मिल्या यशाच्या भिंती
उन्-वार्याचे अन पाण्याचे... मला वावडे नाही
परिस्थितीने मजबुत केल्या आयुष्याच्या भिंती
आरोपांनी अन दुषणांनी... तडे हजारो गेले
तरी संकुचित झाल्या नाहित कधी मनाच्या भिंती
रात्रं-दिन हे दु:खच माझे... सक्त पहारा देते
म्हणुन सुरक्षित मी अन माझ्या मौन सुखाच्या भिंती
स्क्वेअरफुटाच्या हिशोबातल्या घरात वावरताना
आठवती मज साद घालती, पुन्हा कुडाच्या भिंती
ममतेची मोकळी हवा ती... गॅलरीत या नाही
किती हासर्या चाळीच्या अन माजघराच्या भिंती
खूप वादळे आली-गेली, पण.. मी खचलो नाही
जिद्दीच्या पायावर... माझ्या अस्तित्वाच्या भिंती
- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा