दिशा पहाटल्यात

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

चला पुन्हा मनास दु:ख पांघरायला चला
दिशा पहाटल्यात सत्य अंथरायला चला


न मागतो तरी मिळे, न वाचवी तरी उरे
उगाच लाभलाय वेळ वापरायला चला


न आज घेतली, न घेउनीच चाललोय मी
जरा मला धरायला नि सावरायला चला


'अधीकचिन्ह' दोन आकड्यामधील मी असे
वजा करा मला नी बेरजा करायला चला


यमास भेटण्या सरावही करून ठेवुया
चला जगात या पदोपदी मरायला चला


न येतसे कुणी न लागणार चाहुली कधी
उगाच आपआपलेच खाकरायला चला


न झेपणार किंमती हुशार व्हायच्या इथे
तसेच बावळून लाज सावरायला चला


 न खोड जायची मना तुझी कधी जुनीच ही
जरूर ना जिथे तिथेच वावरायला चला


 


 

गझल