एकटा सागरकिनारा एकटा

चित्तरंजन भट - ⏱ १ मिनिट

एकटा सागरकिनारा एकटा
जन्म ओसरणार सारा एकटा

केवढे अब्जावधी तारे नभी
वेगळा प्रत्येक तारा एकटा

सांग ना देणार कुठवर सावली?
मेघ तो उंडारणारा एकटा

काढली झापड तसे कळले मला
मीच नाही धावणारा एकटा

ऐकले, गिरणीत आता राहतो
फाटका, बेगार वारा एकटा

पांगला मोर्चा, तरी वेडा तिथे
देत आहे क्षीण नारा एकटा

धावणारे धावले झुंडीमध्ये
चालला तो चालणारा एकटा

कण्हत आहे कोण गाभाऱ्यामधे?
पोरका, अगतिक, बिचारा, एकटा...

गझल