काही नवीन सुट्टे शेरः
================================
सुगंध शोधत असताना हे समजत नव्हते मला कधी
चाफ्याच्या वरताण घमघमे एक मोगरा घरामधे
=================================
कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते
=================================
ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना
=================================
विस्मरलेले कोणी कोणी भेटत आहे
कधी किती कोणाचा होतो समजत आहे
=================================
शेवटी केले स्वतःला माफ मी
शेवटी केलेच मन हे साफ मी
=================================
लुटले जाताना ही चिंता होती
लुटणार्याला पचेल ना ही दौलत?
=================================
रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते
=================================
त्या डोहाचा गाळ नको उपसूस कधीही
मदतीसाठी आक्रोशत बुडलेत कितीजण
=================================
सगळ्यांना समजत होते की फेकत होते सगळे
फक्त तसे म्हणण्याचे धोके टाळत होते सगळे
=================================
तुझी ती भरजरी साडी विसंगत वाटणारच ना
मुलाचे प्रेत जर ताब्यात घेण्या जायचे होते
=================================
-'बेफिकीर'!
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा