....................................................
... किती लाचार व्हावे ?
....................................................
वाटते आता मला की, मी शहाणा फार व्हावे !
अन्यथा समजू नये काहीच, वेडा ठार व्हावे !!
घेतली माझ्या शिरी मी एवढी ओझी कुणाची ?
का असे आयुष्य हे माझे मलाही भार व्हावे ?
तुज स्मरावे ज्या क्षणी मी त्या क्षणी येशी पुढे तू...
हेच वारंवार झाले...हेच वारंवार व्हावे !!
लाभली आहेत सर्वांना घरे शांती, सुखाची...
हिंडणे माझेच का अद्याप दारोदार व्हावे ?
टांगणीला जीव हा लागू नये माझा, तुझाही...
फैसला होऊन जावा...आर किंवा पार व्हावे !
थेंब चुंबाया दवाचा तू कसा येशील खाली ?
स्वप्न आभाळा तुझे रे हे कसे साकार व्हावे ?
तोल जाणाऱ्यास द्यावा हात, सोबत चालताना...
- अन् निराधारास एखाद्या तरी आधार व्हावे !
हे असे कित्येकदा माझ्याच वेळी होत गेले...
उंबऱ्याशी पोचलो की बंद तेव्हा दार व्हावे !
तू सतारीसारखी; पण तुज गवसणी घातलेली...
- आणि माझी आस ही की, मी तुझा झंकार व्हावे !
वाहण्यापेक्षा कुठेही राख व्हावे स्वप्न माझे...
आसवांनी यापुढे आता तरी अंगार व्हावे !
चामडी देई सुखे; पण प्रश्न हाही व्यर्थ नाही...
माणसाने चामडीसाठी किती लाचार व्हावे ?
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा