खानाबदोष

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

होताच रात हृदया खानाबदोष करतो
मदिरा नसेल तेव्हा गझला सदोष करतो


आरशासमोर रचतो कवितेत दु:ख आणि
 आतून वाहवाचे बेभान घोष करतो


होतात भ्याड सारे शेपूट घालणारे
ज्यांना सलाम दिवसा येताच होष करतो


या साजरी कराया भन्नाट जिंदगी ही
दु:खात सांग कोणी का व्यक्त तोष करतो 


टीका करा कितीही पर्वा करू कशाला
त्यातून जीवनाचा मी शब्दकोष करतो


समजायला हवे ना, की चूक काय आहे
कळुदेत वाचकाला, मुद्दाम दोष करतो


जर भेटला कुणाला कळवा मलाही पत्ता
माणूस जो कुणावर काही न रोष करतो



 


 


 


 

गझल