...................................................
...मारव्याचे सूर काही !
...................................................
लाभले काही़; तरीही हरवले भरपूर काही !
जवळ येतानाच गेले जे हवे ते दूर काही !
तू तुझ्या वकुबाप्रमाणे बोल जे बोलायचे ते....
येत नाही आणता उसना कधी मगदूर काही !
ओरडा कोणी कितीही - `आग नाही लागलेली`
- सांगतो हा भोवताली दाटलेला धूर काही !
- त्याविना होणार नाही पूर्ण ही माझी कहाणी...
ये लिहाया तूच आता शेवटी मजकूर काही !
वाहते आहे अताशा संथ, तृप्तीने परंतू -
वादळी येऊन गेले या नदीला पूर काही !
रोज हे एकेक बुरखा फाडती येऊन माझा...
चेहरे माझे मला वेडावती भेसूर काही !
पाहिलेली सर्व स्वप्ने का कधी साकार झाली ?
राहिली अधुरीच काही... ! आणि चक्काचूर काही !!
चांगले नक्कीच काही आज मज सुचणार आहे...
वेगळा माझ्या मनाचा आज आहे नूर काही !
सांजवेळी एकटा होईन मी अगदीच, तेव्हा-
- ठेव तू माझ्याकडे हे मारव्याचे सूर काही !
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा