............................
मलीन !
............................
प्रश्न आले पुन्हा नवीन किती !
उत्तरे कालचीच दीन किती !
ग्रासले जन्म, जन्म दुःखांनी....
द्यायचे घास आणखीन किती ?
जो म्हणाला चिडून नीच तुला....
तो निघाला स्वतःच हीन किती !
हात फैलाव तू तुझे दोन्ही...
शेवटी पाहिजे जमीन किती ?
या घरांची विशेषणे लाखो ...
देखणी, मस्त, छानबीन किती !
बंगले बंगल्यांवरी बांधा...
लागती एक...दोन...तीन ? किती ? ?
शांत पाहून सोसणे माझे...
दुःख झाले मवाळ, लीन किती !
का विचारू तुलाच मी हेही...?
मी असावे तुझ्या अधीन किती ?
भेटलो आज खूप वर्षांनी....
बोललो आणि अर्थहीन किती !!
जो नको तो विचार मी केला...
वाटले मग मला मलीन किती !
- प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा