मंतरलेल्या सायंकाळी

संतोष कुलकर्णी - ⏱ १ मिनिट


मंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..
अंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..


सांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...
दूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..


रोज पहाटे झेलत असते, कोसळणार्‍या दवबिंदूंना...
..आज कळेना स्पर्शानेही, का थरकापे कर काहीसा...!


ही गगनाची तेजसमाया...वा क्षितिजाचा सोनकिनारा...
...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा..


केवळ काही जलधारांनी शीतल भासे तपती काया
सावरलेले मन काहीसे...ओसरलेला ज्वर काहीसा...


 


- प्रा.डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर


गझल