..........................
प्रघात
..........................
तुझी व्यथा काळजात आहे कुठेतरी !
कुठेतरी आत आत आहे...कुठेतरी !
कशास आता उगाच `नाही` म्हणायचे ?
- तसे तुझ्याही मनात आहे कुठेतरी !!
उजाडले, हे पटायला वेळ लागतो...
मनात या चांदरात आहे कुठेतरी !
गिळून अपमान टाकला मी कधीच जो -
तुझ्या जिवालाच खात आहे कुठेतरी !
दुरून माझ्या समीप आले कुणीतरी
- कुणीतरी दूर जात आहे कुठेतरी !!
सफेद आश्वासने खरी वाटती जिला...
खुळी अशीही जमात आहे कुठेतरी !
जिवंत नाही कधी कुणी देव पाहिला...
म्हणायचे पण - `हयात आहे कुठेतरी!`
सभोवताली सुगंध दाटे उगाच का ?
कुणीतरी गीत गात आहे कुठेतरी !
कृतघ्नतेला कृतज्ञता नाव द्यायचे...
म्हणे, असाही प्रघात आहे कुठेतरी !
-प्रदीप कुलकर्णी
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा