....सारे मला मिळाले !!! (गझल).
.
*
काही न मागताही सारे मला मिळाले ,
केसात माळले मी , तारे मला मिळाले !
*
मोडून मांडला तू मांडून मोडलाही ,
नेत्रात दोन अश्रू खारे मला मिळाले !
*
वाटेतल्या फ़ुलांचे काटेच बोचलेले ,
एकेक घांव ताजे कारे मला मिळाले ?
*
गाठू कसा किनारा , लाटेस ओढ भारी ,
ते स्वैर वाहणारे वारे मला मिळाले !
*
मी आजही भुकेली एका अलिंगनाची ,
मौनातले उसासे सारे मला मिळाले !
*
-सुप्रिया (जोशी) जाधव.
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा