संवेदनशिल विषयांना बाजार बनविले जाते
टोप्या नि मेणबत्त्यांना विक्रीस आणले जाते
ही घुसमट कोणा सांगू, मी न्याय कुणाला मागू?
भर रस्त्यावर डोळ्यांनी हे स्त्रीत्व भोगले जाते
त्या कथा कोठवर ऐकू … ज्यामध्ये एका स्त्रीला
पाचात वाटले जाते … द्यूतात लावले जाते …
षडयंत्र ऋतूंचे इथल्या मज कुठे माहिती होते?
कोणास फुलविती, कोणा टाळून मारले जाते
नात्याने मानवतेच्या देताच कुणाला सवलत
त्या सवलतीसही येथे मग हक्क समजले जाते
घर घेता आले नाही , आभार तुझे दारिद्रया
पडतात नवे इमलेही अन स्वप्न गाडले जाते
जन्मतो पुढारी पहिला , तो देव घालतो जन्मा
मग श्रद्धेच्या बाजारी देऊळ बांधले जाते …
'अरूण' (शुभानन चिंचकर)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा