श्री. कुमार जावडेकर यांनी लिहिलेली 'सोपे नसते' हा रदीफ असलेली एक सुंदर गझल वाचण्यात आली होती. तोच रदीफ घेऊन मीही लिहिलेलं इथे देत आहे.
सोपे नसते
चांदण्यातला दाह सोसणे सोपे नसते
जळताना दरवळून जाणे सोपे नसते
सोपे नसते साध्याशा प्रश्नांचे उत्तर
मनातले नेमके सांगणे सोपे नसते
नकळत केव्हांतरी निसटतो एक उसासा,
मुकेपणाने वाट पाहणे सोपे नसते
लखलखणाऱ्या रत्नखचितशा आकाशातुन
ध्रुवतारा शोधून काढणे सोपे नसते
सभोवतीच्या झिंग आणणाऱ्या गलग्यातुन
गुंजन हृदयातले ऐकणे सोपे नसते
आठवणींचे उरात ओझे होते अवघड
आभासातुन संगत जपणे सोपे नसते
कधी हरवतो विणीतला नक्षीचा धागा
गुंत्यामधुनी मग उलगडणे सोपे नसते
'हे अवघड, ते अवघड' नुसते म्हणायचे, पण,
अवघड तेही टाकुन देणे सोपे नसते
-सतीश
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा