माझे परममित्र श्री. चित्तरंजन सुरेश भट यांना दादांच्या नावाने स्थापन केलेल्या या संकेतस्थळासाठी हार्दिक शुभेच्छा. ही माझी येथील पहिली गझल......
ये रे पुन्हा वसंता, घेतो तुझी दखल मी
आता न राहिलो रे, पूर्वीपरी विफल मी
स्थितप्रज्ञ जाहलो अन्, चिंता पळून गेल्या
माझ्या मनात काही, केले नवे बदल मी
मजला छळावयाला, कोणीच येत नाही
सार्या विवंचनांना, देतो अता बगल मी
चंद्रासमान झालो, शुक्लात दिग्बली बघ
कित्येक डाग माथी, दिसतो तरी धवल मी
स्पर्शून याद गेली, सखये तुझी अचानक
धुंदीत त्या अनोख्या, लिहिली नवी गझल मी
सारे गमावले मी, केवळ तुझ्याचसाठी
मज ना कळे 'अगस्ती', झालो किती सफल मी
----अगस्ती
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा