वगैरे...

वैभव जोशी - ⏱ १ मिनिट



पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे

खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे

बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले की पुढारी वगैरे

कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे

अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे

तिथे एकटा तोच होता दरिद्री
रुबाबात होते पुजारी वगैरे

असे ऐकले शेवटी न्याय होतो..
पुढे काय झाले "निठारी" वगैरे..?

किती जीवना रोज देतोस धमक्या
दिली का यमाने सुपारी वगैरे



गझल