वखवखे मला

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

सहज सांगतात दोष सारखे मला
करत राहतात लोक पारखे मला


वलय आखतात आखतात वर्तुळे
टाकताच पाय बोचती नखे मला


वाटणी समान जाहलीशी वाटते
स्वर्ग त्यास लाभले नी दोजखे मला


माझी वाट पाहते समजताच मी
पाहते अशी जशी न ओळखे मला


नाजुकी तुझी फुलाहुनी अधीक तर
सांग माळतेस का फुले सखे मला


पळभरी सुखात गुंतलो मी पाहुनी
दु:ख शोधण्यास काय वखवखे मला

गझल