... वंशातल्यांचे

अजय अनंत जोशी - ⏱ १ मिनिट

मी पुरावे शोधले त्यांच्यातल्यांचे
अन् दुरावे रोखले माझ्यातल्यांचे

चालली कसरत अशी अर्थासभोती
नाच नंगे खेळती शब्दातल्यांचे

एकही शत्रूस नाही सोडले मी
काय मग होईल या हृदयातल्यांचे ?

येर बसती सज्जनांच्या पंगतीला
बेत काहीसे फसावे आतल्यांचे

सत्य कोठे माहिती आहे कुणाला ?
नाव होते आजही पेल्यातल्यांचे

सोडती घरटे... तरी सोडा म्हणावे
मन कधी मोडू नये डोळ्यातल्यांचे

नाव माझे 'अजय' मीही सार्थ केले
पण, जगाला पाहिजे वंशातल्यांचे

गझल