यादगार

भूषण कटककर - ⏱ १ मिनिट

भांडून या मनाशी डोळ्यात धार येते
राहून राहुनी ही साली बहार येते


स्वप्नात जोर दावे झोपेमधे न मावे
सत्यात तीच इच्छा होऊन ठार येते


शब्दास नाव ठेवा "हा बोथटात मोडे'
काढून फेकलाकी त्यालाच धार येते


माझ्या मनास घाली मी सारख्याच घिरट्या
अंदाज ना तयाचे कोठून दार येते


जाहीर सांग येथे तंत्रास भेट देणे
आम्हास येत नाही की 'यादगार' येते?


एकेक ओळ माझी वाचावयास गर्दी
की शोधण्यास जैसी सापास घार येते


दु:खास माळणे मी सोडून देत आहे
की दु:ख या जगाच्या डोळ्यात फार येते


आजन्म पाहतो मी सौख्यास धीर नाही
येते, पसार होते, होते पसार, येते


गर्दीत शायरांच्या तारीफ ऐक माझी
मागून नांव येते आधी फरार येते


 


 



 


 

गझल