तू दिलेली सोडचिट्ठी...

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

==================


राख  नाही, ना  कुठेही  धूर  थोडासा
काळजाचा  पेटला  कापूर  थोडासा..


भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!


वाहतो  आहेस  तू  रक्तातूनी  माझ्या,
का  तरीही  वाटशी  तू  दूर  थोडासा?


तू  दिलेली  सोडचिठ्ठी  हरवली  आता-
राहिला  लक्षात  पण  मजकूर  थोडासा..


थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा..


सांत्वनाची  फार  घाई  चांगली  नाही,
ओसरूदे  भावनेचा  पूर  थोडासा...


 


 


-ज्ञानेश.
====================

गझल