===============
गरजत आहे, बरसत नाही
गरजत आहे! हरकत नाही !!
मुबलक चटके बसले आता
अनवट वाटा तुडवत नाही
डचमळती डोळ्यातून सगळ्या..
आठवणी मी हलवत नाही
शुकशुक झाली ही सवयीची,
मी आताशा दचकत नाही
चघळत बसतो मेंदू माझा
पटकन सगळे विसरत नाही
अवघड जागी दुखणे झाले..
सोसत नाही; संपत नाही
रोज नव्याने वार तुझा अन्
या ह्रदयावर चिलखत नाही
नक्की कसला हा कंटाळा?
रोजच आता करमत नाही !
फरफट आहे, फरफट नुसती
जगणे याला म्हणवत नाही
या गझलेमधल्या मुद्द्यांशी
शायर स्वत: सहमत नाही...
-ज्ञानेश.
================
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा