चंद्र झालो

आदित्य_देवधर - ⏱ १ मिनिट

मी वाट चांदण्याची शोधीत चंद्र झालो
माझ्या कलाकलांना माळीत चंद्र झालो

कल्याण आळवीती ओल्या मधाळ राती
गंधार भाववेडा ऐकीत चंद्र झालो

खाणाखुणा तमाच्या शोधून सांगताना
शुक्रास मी ललाटी भाळीत चंद्र झालो

शब्दात झाकलेल्या अर्थास तेज देण्या
अंधार तेववोनी ऐटीत चंद्र झालो

होता सभोवताली बेधुंद रोषणाई
रंगीत चंद्र झालो, धुंदीत चंद्र झालो

रातीस पौर्णिमेच्या अंधार भोगणारी
पापी पिशाच्च प्रेते जाळीत चंद्र झालो

गझल