.............................................................
ठेवणीतल्या आठवणींना....
.............................................................
गतकाळाच्या कपाटातले जुनेर जगणे दमट, दमट !
ठेवणीतल्या आठवणींना आता येतो वास कुबट !
अश्रूसुद्धा पूर्वीइतके राहिलेत हे तरल कुठे ?
कधीकाळच्या दुःखाचाही झाला आहे रंग फिकट !
त्यांच्या सलगीवरी एवढे उगाच मरणा जळू नये...
या श्वासांचे देहासंगे जन्मभरी असणार लगट !
कधीपासुनी एका ओळीवरीच रेंगाळली कथा...
पहाटवाऱया, ये, ये लवकर, हे रात्रीचे पान उलट !
कसलेला असशील एक तर किंवा अगदी कच्चाही...
किती निरागस भासतोस तू दाखवताना तुझे कपट !
भेटतेस तू रोज परंतू, भेटतेस तू रोज कुठे ?
एकदाच ये कधीतरी मज भेटाया तू तुझ्यासकट !
नाव तुझे मी घेत ईश्वरा घुमत राहिलो सतत जरी...
काय मला देईल देउनी आकाशाचा रिता घुमट ?
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा