असे प्रेम देवा

साकार - ⏱ १ मिनिट


सहज गीत ओठी कुणी गुणगुणावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे
जणू शिंपल्यातून मोती वसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे


किती छाटले झाड फुटती धुमारे, किती मेघ  आले विझे सूर्य कारे ?
किती, वार झेलूनही ना मिटावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे


जशी भेटते ती नदी सागराला, जशी लाट शोधून गाठे किनारा
जळावीण मासे जसे तडफडावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे


जरी जीवनाच्या दिशा भिन्न झाल्या,  कधी धुंद अथवा कधी खिन्न झाल्या
तरीही मनांनी मनांतच वसावे ,   असे प्रेम  देवा नशीबी  असावे


धरा सांग चंद्रा कधी भेटते का,  पहाटेस  संध्या कधी गाठते का
तशी जाणती साथ  देण्या असावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे


कधी दक्षिणा ना धरा  मागते(रे) , कधी दाम प्रेमास का माय घेते
सदा प्रेम निरपेक्ष हृदयी ठसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे


उगा ध्यान बगळ्यास भावे कशाला, उगा मकर नेत्रात आसू कशाला
अशा मृगजळा ना कधीही फसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे


सदा संत गाती तुझे नाम भावे, अनंता तुझे रूप कोणा न ठावे
तरी आळवीता मिळावे विसावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे


विराटा तुझे रूप गगनी दिसावे, कधी सूक्ष्म रूपी तुझे भास व्हावे
न दिसता जसे गंध ते दरवळावे, असे प्रेम  देवा नशीबी  असावे. . . .


सुधीर


 


गझल