...नकोशा रात्री !
टाळून कुठे टळतात नकोशा रात्री... ?
अंगावर कोसळतात नकोशा रात्री... !
दिसतात तशा या शांत जरी वरकरणी
आतूनच खळबळतात नकोशा रात्री !
बेहोष, सुगंधी, धुंद, हवीशी स्वप्ने...
वाऱ्यावर दरवळतात नकोशा रात्री !
मी हाकलतो...पण लोचट जाती कोठे...?
दारातच घुटमळतात नकोशा रात्री !
डोळ्यांत व्यथा दडवून कितीही ठेवा....!
...गालांवर ओघळतात नकोशा रात्री !
आहेत जणू या पिंपळ आठवणींचे...
डोक्यावर सळसळतात नकोशा रात्री !
यांच्यावरती उपचारच नाही आता -
जखमांसम भळभळतात नकोशा रात्री...!
सोसून असे हे कुठवर सोसायाचे...?
निःशब्दच तळमळतात नकोशा रात्री !
थांबेल कुठे ही आग...कशी अन् केव्हा...?
विझतात...पुन्हा जळतात नकोशा रात्री !
कोलाहल वा गलका न, जराही दंगा...
मज शांतपणे छळतात नकोशा रात्री...!!
- प्रदीप कुलकर्णी
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा