कसे जगावे...?

संतोष कुलकर्णी - ⏱ १ मिनिट


'कसे जगावे ...?..' प्रश्न एवढा खटकत राही
शरीर माझे, आत्मा माझा झटकत राही


उभा इथे मी आयुष्याच्या तीरावरती..
क्षणाक्षणाची वाळू खाली सटकत राही


शरीर गेले, तरी न त्याची गाथा सरली
जगास अवघ्या सांगत सत्ये भटकत राही


उगाच माझ्या आयुष्याची क्षेमखुशाली...
विचारून तो येता - जाता हटकत राही..!


कुठे कुणाला दिसला का तो ईश्वर सांगा...
..सवाल त्याच्या अस्तित्वाचा लटकत राही..


                              - प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर


गझल