वेग माझ्या पालखीचा मंद होता
वेग माझ्या पालखीचा मंद होता
आसवांचा पूर नि स्वच्छंद होता
ओठ राधेचे अता परके तरीही,
आजही ओठांवरी 'मकरंद' होता
तेच अश्रू ढाळले, जे तू दिलेले,
काय मज ह्या आसवांचा छंद होता?
'बघ जरा, आलोय मी', तु बोलला पण,
जाहला रे श्वास माझा बंद होता
मोरपंखी येथला आराम तरीही,
झोपडी ती!-वेगळा आनंद होता
ह्या किनाऱ्याची अशी दमछाक झाली,
आज हा दरिया कसा बेबंद होता!
-मानस६
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा