किती?

केदार पाटणकर - ⏱ १ मिनिट

मी करावा निवाडा जगाचा किती ?
कौल घ्यावा स्वतःच्या मनाचा किती ?

केशरी सांजवेळी, सकाळी निळे
माग काढू अशा अंबराचा किती ?

प्रेम सर्वांवरी खूप केले तरी
शेवटी राहिलो मी कुणाचा किती ?

ऐकली मी तुझ्या अंतरीची व्यथा
फायदा त्यात माझ्या मनाचा किती ?

हे तपासायचा लागला छंद की,
दोष माझा किती? प्राक्तनाचा किती?

गझल