खालील रचना या साईटवर प्रकाशित केलेली होती. काही दिवसांनी ती वाचताना काही बदल केले व नवी गझल तयार केली. काही शेर जसेच्या तसे आहेत. येथील नव्या व जुन्या सदस्यांसाठी दोन्ही रचना देत आहे.
जुनी प्रकाशित रचना
शेकडो होती तुला मी धाडली पत्रे
सांग, त्यापैकी किती तुज भेटली पत्रे
कागदावर आसवे उबदार पडली अन्
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे
एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे
वाकडा माझा नसावा शब्द यासाठी
बारकाईने स्वतःची वाचली पत्रे
अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे
नवी रचना
तीच भेटावी, तशी ती भेटली पत्रे
सर्व काही समजले, ती बोलली पत्रे
आसवे उबदार पडली कागदावरती
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे
एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे
अर्थ कळला आज माझ्या भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे
ऐकुनी घेतात माझ्या भावना सा-या
नेहमी होती सखीसम भासली पत्रे
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा