तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

वैभव वसंतराव कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

हवा आनंदली थोडी विखारी गारवे गेले
तुझे घन आजही बरसून माझी आसवे गेले

जसे सांगीतले मी वाट गझलेची निवडल्याचे
तसे वाटेतुनी माझ्या सुखांचे हायवे गेले

तुझा अंधार झाल्याचे मला कळले कसे नाही
किती चमकून अत्ता आठवांचे काजवे गेले

कशाने शुकशुकाटाची अवस्था लाभली आहे
उडुन माझ्या मनातुन काय इच्छांचे थवे गेले

जगाने फार शंकावून माझी तोलली भक्ती
जगाचे पार कामातून सारे ताजवे गेले

मुळीही जात नसते विठ्ठला ती जातही गेली
तुझ्या डोहामधे उतरून माझे जानवे गेले

किनारे पश्चिमेचे बोलवत होते अश्यावेळी
न जाणे का उगवतीच्या दिशेला नाखवे गेले

तुला भेटावयाचा आजसुद्धा मूड झालेला
मनाचे मूढ मांजर आजसुद्धा आडवे गेले

विनवले चंद्र्भागेला..जरा भिजवून जा.. तेव्हा
शिवारातून देहाच्या व्यथांचे कालवे गेले

खुळ्या आशेवरी केल्या किती आषाढवार्‍या मी
कुठे झरला तुझा श्रावण हजारो भादवे गेले

~वैवकु

गझल