का विश्वासच उरला नाही छातीवरती
सवलत मागत उठतो जो तो जातीवरती
इंद्रधनूचे रंग तुझ्या जर हातामध्ये
कशी दिसेना हिरवी नक्षी मातीवरती
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती
चला जरा ही सुंदरतेची व्याख्या बदलू
ठरवायाचे कुठवर नुसत्या कातीवरती
इथेच सारे दिले-घेतले वसूल कर तू
मला नको आहेत येथली नाती वरती
आयुष्याची गोष्ट कळाया अवघड नसते
शेवट लिहलेला असतो सुरुवातीवरती
_________________________ शाम
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा