हसवणारे, खिदळणारे इथे कोणीच नाही
रिते अंगण, मुकी दारे.. इथे कोणीच नाही
मनाला त्रास देणारे हजारो भेटलेले
मनाला शांत करणारे इथे कोणीच नाही
कुणावरती लिहावे मी ? कुणाचे गीत गावे ?
फुले, पाने, नदी, वारे..इथे कोणीच नाही
कुठे गेला जुना कट्टा ? कुठे गप्पा हरवल्या?
गड्यांनो, या, पुन्हा या रे...इथे कोणीच नाही
दरेकाच्या मुखावरती हसू आहे तरी वाटे..
मनापासून हसणारे इथे कोणीच नाही
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा