कधी...

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

कधी...

कुणी आमिषे दाखवली तर कुणी पाडली भूल कधी !
कुणी सारखे नागवले मज...  दिली शेवटी हूल कधी !

कधी गाव हे आवडले तर कधी भावली ती वसती...
इथे टाकले अंग कधी तर तिथे मांडली चूल कधी  !

तुझी ही अशी मान हले; मग तसा त्यावरी जीव झुले...
कधी मोरणी `होय` म्हणे तर `नको` सांगतो डूल कधी !

किती घासल्या रोज मनावर तुझ्या सारख्या आठवणी....
कुठे पेटला सांग तरी पण जिण्याचा पुन्हा गूल कधी ?

मनासारखी सोबत-संगत मिळे नेहमी काय कुणा ?
कधी लाभते फूल सुवासिक,  सले अंतरी शूल कधी !

तुझी सोडली आस तरी पण तुझी संपते ओढ कुठे.. .?
तुझे सारखे भास कधी तर तुझी फक्त चाहूल कधी !

दरी सांधली ही न कुणी, मग दुरावेच आले नशिबी....
कुठे अंतरे ही मिटली ...? नच कुणी बांधला पूल कधी !

सुगंधातही जे न कमी, वर दिसे रंगही रोज नवा....!
कुणी आणले काय कुणास्तव असे वेगळे फूल कधी ?

अता वाटते... बालपणातच खरी मौज होती दडली...
परी खंत... झालोच न आपण मुलासारखे मूल कधी !!

तुका तोच तू...होय, बरोबर पटे खूण ही आज मला...
अणूहून तू  सूक्ष्म कधी तर नभाएवढा स्थूल कधी !

अता मान ही डोलवण्याविण मला काम नाहीच दुजे...
पडे प्रश्न...पाठीवरती पण कुणी टाकली झूल ? कधी ?

- प्रदीप कुलकर्णी

 

 

गझल