कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही
कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही
कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही
कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा तुझा सहवासही नाही
उद्या माझ्या घराजवळी सुखे येतीलही सारी
तरी हे दु:ख संपावे अशी मज आसही नाही
कशाची पूर्तता नाही, मिळाले अर्धवट सारे
पुरेसे दु:खही नाही, खरा वनवासही नाही
उपेक्षित सोन-स्वप्नांची अपेक्षा व्यर्थ तू धरते
उगवले पेरल्यावाचुन असा इतिहासही नाही
सुगंधाशी दिले संबंध मी झिडकारुनी माझे
जवळ माझ्या अता उरले पुरेसे श्वासही नाही
तुझ्या ओठी पुन्हा माझे कधीही नाव ना यावे
म्हणूनच आज मक्त्याचा मला हव्यासही नाही
- जनार्दन केशव म्हात्रे
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा