कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी ...

अनंत ढवळे - ⏱ १ मिनिट

आई जेंव्हा जाता जाता रडली होती
काही  पाने वार्‍यावर  थरथरली होती

पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती

वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी
माझ्यामागे धूळ जराशी उडली होती....

अनंत ढवळे..

 

 

 

 

गझल