जाग आली

मनीषा साधू - ⏱ १ मिनिट


आटुनी गेले जिव्हाळे,जाग आली
कातडीवर आळ आले,जाग आली ।


वास्तवाशी तह नव्याने काल केला
आणि पुन्हा युद्ध झाले,जाग आली ।


का नव्याने शोधिली कृष्णात भक्ती
का मिरेचे विष प्याले,जाग आली ।


वाटले मज तू कुणी नाही निराळा
पण तुझे सारे निराळे! जाग आली ।


भावनेच्या मखमली गुंगीत जाता
स्वप्न कासावीस झाले,जाग आली ।


आठवानी खरवडे जखमा पुराण्या
तरुण सारे घाव झाले,जाग आली ।


मी तुला माझ्यातुनी 'चल जा!'म्हणाले,
आणि माझे प्रेत झाले! जाग आली ।


गझल