मी अहल्येसारखी... !

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

.........................................
मी अहल्येसारखी...!
.........................................


शेवटी गेलास ना निखळून तू ?
जायचे  ना जग जरा उजळून तू !


आंच  दुःखाची जराशी लागता...
का असा जातोस रे वितळून तू ?


वेळ  भरतीची तुझ्या समजेचना...
ये अवेळी आजही उसळून तू !


संपलो मी ! वैर माझे संपले...
जा फुले माझ्यावरी उधळून तू !


दुःख झाले कोणते इतके तुला ?
हासशी सर्वांग का घुसळून तू ?


काळजाला सल पुन्हा काट्यापरी...
...आणि मग डोळ्यांत जा तरळून तू !


फेकली कोणी तळाशी पौर्णिमा ?
काढ  अंधारास या ढवळून तू !


ही कुठे काया ? अरे, छायाच ही !
एवढा गेलास का हुरळून तू !!


चारचौघांसारखा आहेस ना  ?
चारचौघांच्यात जा मिसळून तू !!


शब्द तू एकेक हा घासून घे...
अर्थही एकेक घे विसळून तू !!


मी  अहल्येसारखी आहे शिळा...!
एकदा जाशील का जवळून तू ?



- प्रदीप कुलकर्णी

गझल