यापुढे

पुलस्ति - ⏱ १ मिनिट

मी सांगणे दिले; सोडून यापुढे
तुमचे तुम्हीच घ्या; पाहून यापुढे


हे अर्थ-लेख, हे...चवदार आकडे!
ताटात हेच घ्या; वाढून यापुढे


"कंटाळतोस तू; अन्नास त्याच त्या..."
मी लाजवूच का... बोलून यापुढे?


मी दचकलो असा,  हे कोण बोलले?
"ठेवू नका मला कोंडून यापुढे"


 बेभान शब्द हे; मी आवरू कसे?
खुंटेल बोलणे, बोलून यापुढे...


गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे


सूर्यासवे नव्या; येती जुनेच ते -
टळतात प्रश्न का; जागून यापुढे...


मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...

गझल