..उशीर

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

(भुषण कटककर यांनी दिलेल्या मिसर्‍यावर केलेली ही गझल. वृत्ताच्या सोयीसाठी मिसर्‍यात थोडासा बदल केला आहे.)


========================
उशीर  झाल्याक्षणी  कळाले, 'उशीर  झालेला  आहे'
उशीर  हा  नेहमी  असा  'वक्तशीर'  झालेला आहे..!


कधी  तुझे  पावसाप्रमाणे  निघून  येणे  घडायचे?
इथे  कुणी  चातकाप्रमाणे  अधीर  झालेला  आहे...


"मिळेचना  नोंद  कोणतीही" म्हणे  तुझी  आमच्याकडे,
किती  पहा  देव  आमचा  बेफिकीर  झालेला  आहे  !


उगाच  का  प्राक्तना  मला  तू, चुकार  प्यादेच  मानले?
पहा  नव्याने  जिवंत  माझा  वजीर  झालेला  आहे !


विसावल्या  वेदना  मनाच्या  तुझ्याच  छायेमधे 'गझल'
तुझ्यामुळे  आमचा  उन्हाळा  शिशीर  झालेला  आहे...


 


 


-ज्ञानेश.
==========================