..चर्चा

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

====================


नाही  अजून  झाली, माझ्या-तुझ्यात  चर्चा..
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या  जगात  चर्चा


आता  कुठे  जरासे  संकेत  मोडले  तू
आता  कुठे  जराशी  आली  भरात  चर्चा..


येणार ती  पुन्हा रे.. ठोका चुकेल  ना रे..?
छातीत  स्पंदनांची  आपापसात  चर्चा !


भेटूनही  न  वाटे  मित्रास  भेटल्याचे
पेल्यात  व्हायच्या  त्या, झाल्या  कपात  चर्चा


"आधी  असा  न होता.. हातामधून  गेला.."
हल्ली  अशीच  चाले  माझ्या  घरात  चर्चा


चर्चेमधून  सार्‍या  निष्कर्ष  काढला  मी-
करणार  ना  कधी  मी, या  जीवनात  चर्चा !


खच्चून दे  शिवी  तू, भांडून  घे  जरासे
घोळायच्या  कशाला  आता  तुपात  चर्चा ?*


उल्लेख  झुंजण्याचा  झाला  न  कोणताही,
माझ्या  पराभवाची  दाही  दिशात  चर्चा..


चुकले  कसे  कुणाचे?.. बोलू  निवांत  वेळी
हातात  हात  दे  तू, का  वादळात  चर्चा ?


संवाद  मूक  झाले... स्पर्शात  शब्द  आले..
गेल्या  फिटून शंका.. गेल्या  ढगात  चर्चा !!


 


 


-ज्ञानेश.
=====================


(* हा शेर चित्तरंजन यांच्या  एका शेरावरून प्रेरीत आहे- "हातघाईने पुन्हा  भांडून घेऊ, काय चर्चेने गड्या साधेल आता?")

गझल