रिवाज पाळू...

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

======================

रिवाज  पाळू , जरी  शहारा  कुठेच  नाही..
तुझ्या  न  माझ्याकडे.. बिचारा  कुठेच  नाही !

बरेच  काही  जुनेपुराणे  पडून  आहे..
मनात  आहे  तसा  पसारा  कुठेच  नाही !

दिशा  तुला  पाखरा  कशी  सापडेल  आता?
नभातला  तो  प्रकाशतारा  कुठेच  नाही..

निबंध  माझा  अशामुळे  वाटतो  अधूरा,
लहानसा  तो  तुझा  उतारा  कुठेच  नाही..

पुन्हा  असे  तू  नकोनकोसे  नकोच  बोलू ,
मला  हवे  तेच  बोलणारा  कुठेच  नाही

तुझ्याच  डोळ्यात  राहतो  मी, कुठे  न  जातो
हवाहवासा  असा  पहारा  कुठेच  नाही..

पुन्हा  जरासे  कुशीत  आता  मला  शिरूदे,
जगात  सार्‍या  असा  निवारा  कुठेच  नाही..

तुला  पटो  ना  पटो, तरी  हे  असेच  आहे
तसा  किनारा..पहाटवारा...  कुठेच  नाही !

बघून  माझी  तहान  वेडी, सुखावली  ती..
सुरा  म्हणाली- "असा  पिणारा  कुठेच  नाही..!"

फुला, तुला  स्पर्शल्यावरी  एवढे  कळाले -
"कुठेच  नाही ! असा  निखारा  कुठेच  नाही.."

 

-ज्ञानेश.

========================

गझल