भळभळतांना जाणवले की..

ज्ञानेश. - ⏱ १ मिनिट

(माफ करा, आता अगदी राहवतच नाहीये, म्हणून गेल्या १३ दिवसांचा गझललेखनाचा उपवास सोडतो आहे.)

=============================

भळभळतांना  जाणवले  की  रुतले  होते  टोक  किती
जगण्याच्या  माथ्यावर  पडली  'तू  नसल्याची ' खोक  किती..!

सुखा, तुझ्यापाठी  पळतांना  जाणवले  नाहीच  कधी,
अस्तित्वाच्या  ताठ  कण्याला  सुटले  माझ्या  पोक  किती !

परस्परांशी  सौहार्दाचे  प्रयोग  रंगत गेले  अन्
पडद्यामागे जाता  जाता  बदलत गेले  लोक  किती..

यंदाच्या  जनगणनेमध्ये  हे पण  मोजून  टाका  की--
किती  अडाणी  लोक  शहाणे? शिकलेले  बिनडोक  किती?

किती  उपेक्षा  केली  त्याची, सदैव  जे  माझे  होते..
कधीच  माझे  झाले  नाही, त्याच्यासाठी  शोक  किती !

शिकून  घ्या रे  सगळे  ओझे  अपुले  आपण  पेलाया
खुशाल  टाका  मान, असे  उरले  खांदे  निर्धोक  किती??

 

-ज्ञानेश.
===========================

गझल