=============
विरंगुळा या मनास नाही
उमेद या जीवनास नाही..
असेच हल्ली मनास होते,
उदास आहे/ उदास नाही..
अजून थोडे चिडून भांडू ,
पुरी निघाली भडास नाही !
छळून गेला सवाल, ज्याला-
कधीच नेले धसास नाही.
चुकून झाले.. चुकून होते..
दुखावण्याचा हव्यास नाही !
कसा सुखाचा फलाट यावा?
तुझ्या दिशेने प्रवास नाही...
"विमा"च घेतो करून, देवा..
तुझा भरोसा अम्हास नाही !!
-ज्ञानेश.
===============
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा