...काय फायदा ?

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

...काय फायदा ?

काढू तुझा कशास माग...? काय फायदा ?
सारा वृथाच पाठलाग...काय फायदा ?

तुज आठवून चांदणे मिळेल का कधी...?
मिळणार फक्त आग आग...काय फायदा ?

गेले घडायचे घडून....जे घडायचे...
कोणावरी धरून राग...काय फायदा ?

स्वार्थी  सवाल हाच सारखा मला छळे  -
`केलास तू कशास त्याग...? काय फायदा ?`

लागायचा कलंक, लागलाच शेवटी...
आता धुऊन डाग डाग...काय फायदा ?

जमवून ठेवलेत फक्त शून्य शून्य तू...
गुणलेस वा  दिलास  भाग...काय फायदा ?

तू रक्त शिंपलेस, शिंपशीलही उद्या...
गेल्यावरी जळून बाग...काय फायदा ?

होतात ओळखी नवीन, लाभ हा जरी -
झालो मलाच मी महाग...काय फायदा ?

वागायचा तसाच वागतोस तू मना...
सांगून रोज ,  `नीट वाग...` काय फायदा ?

दोहा निदान एक पाहिजे सुचायला...
नुसता मिळून हातमाग...काय फायदा ?

डोळे मिटायचीच वेळ येत चालली...
येऊन शेवटास जाग...काय फायदा ?

- प्रदीप कुलकर्णी

गझल