...का दिसेनात आता कुठे ?

प्रदीप कुलकर्णी - ⏱ १ मिनिट

..का दिसेनात आता कुठे ?

ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?

सांग, झाली कधीपासुनी ही सुखासीन कांती तुझी ?
सांग ना... बोचकारे, चरे का दिसेनात आता कुठे ?

भेटलो, बोललो, हासलो  काल मी ज्या सुखांच्या सवे...
...काय झाले असावे बरे ? का दिसेनात आता कुठे ?

मीच झालो कशाला इथे एकटा कावरा-बावरा ?
सोबती कावरे-बावरे का दिसेनात आता कुठे ?

कोरडे कोरडे हे जिणे वाहता वाहता थांबते - 
- आणि पुसते मला ,`ते झरे का दिसेनात आता कुठे ?`

एकही पान ज्यांच्याविना त्या तरूचे न हलले कधी...
तीच त्याची पिले-पाखरे का दिसेनात आता कुठे ?

आज संबंध माझे-तुझे जीर्ण पत्राप्रमाणेच ना ?
जी हवी ती मला अक्षरे का दिसेनात आता कुठे ?

बोलणे,  ऐकणे, पाहणे यास धरबंद नाही अता...
संयमी ती तिन्ही वानरे का दिसेनात आता कुठे ?

हाल झाले कुणाचे कसे...  त्रास झाला कुणाला किती...
ते बिचारे सगे-सोयरे का दिसेनात आता कुठे ?

सांग, घेऊ कुठे आसरा ? सांग, आता कुठे मी दडू...?
जीवना रे,  तुझे कोपरे का दिसेनात आता कुठे ?

शोधिली मी किती मंदिरी, शोधिली मी उरी-अंतरी...
बा, विठोबा, तुझी लेकरे का दिसेनात आता कुठे ?

- प्रदीप कुलकर्णी 

गझल